ओवी लाईव्ह

ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्यांमधून जीवनाचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या गोष्टी. नीलाज्जी नातवंडांना ज्ञानेश्वरीतील ओव्या छोट्या छोट्या, मजेशीर गोष्टीतून सांगते.

दादाच्या बड्डे केकपासून, कॉलेजमधील सबमिशनपर्यंत आणि फ्रेंडशिप डे सेलिब्रेशनपासून अरुणिमाच्या कहाणीपर्यंत – मुलांच्या आणि तरुणांच्या जगात घडणाऱ्या प्रसंगांमधून नीलाज्जी त्यांना ज्ञानेश्वरीतील विचारांची ओळख करून देते.

या गोष्टी मुलांना हसतखेळत प्राचीन ज्ञानाशी जोडतील. ज्ञानेश्वरीतील ओव्या केवळ वाचण्यासाठी नाहीत, तर जगण्यासाठी आहेत!

Buy Here – [Notion Press] [Amazon]

Listen to a story here …

Mentor

Introduction


पूजाने नीलाज्जीला साकडे घातले, “आजी, मला रोज ज्ञानेश्वरीतली एक ओवी सांग की!”

तिचा आग्रह नीलाज्जीला सुखावून गेला. पूजाच्या केसांवरून हात फिरवत ती हसली. म्हणाली, “अगदी आनंदाने सांगेन! पण ज्ञानोबांच्याच शब्दात सांगायचं झालं, तर हे काम म्हणजे—” तिने डोळे मिटून ओवी म्हटली—

कीं टिटिभू चांचुवरी। माप सुये सागरी।
मी नेणतु त्यापरी। प्रवर्ते येथ॥ १.६८॥

पूजा एकटक आजीकडे पाहत होती.

“म्हणजे गं काय?”

“एकदा काय झालं…” नीलाज्जी सांगू लागली, “समुद्राच्या जवळ एका टिटवीने आपलं घरटं बांधलं.”

“टिटवी म्हणजे?”

“अगं, एक छोटासा पक्षी. त्या टिटवीने आपलं घरटं वाळूत बांधून त्यात अंडी घातली.”

“मग?”

“मग एक दिवस समुद्राला मोठी भरती आली. आकाशात काळे ढग जमले. वारा जोराने वाहू लागला. एकामागून एक मोठमोठ्या लाटा किनार्‍यावर आदळू लागल्या. अचानक एक प्रचंड लाट किनाऱ्यावर येऊन आदळली. त्या लाटेने टिटवीचं घरटं उध्वस्त केलं आणि तिची अंडी पोटात घेऊन गेली.”

पूजाचा चेहरा उतरला. “अरेरे! मग टिटवीने काय केलं?”

“ती समुद्राकडे पाहत राहिली. तिची अंडी कुठे गेली, काहीच दिसत नव्हतं. समोर फक्त अथांग समुद्र. तिने ठरवलं माझी अंडी मी परत मिळवणार.”

पूजा आश्चर्याने म्हणाली, “पण समुद्र तर एवढा मोठा! ती काय करणार होती?”

नीलाज्जी हसली. “तिने आपली छोटीशी चोच पाण्यात बुडवली, थोडंसं पाणी उचललं आणि किनाऱ्यावर आणून टाकलं.”

“एवढंच?”

“हो. पुन्हा चोचीत पाणी घेतलं. पुन्हा किनार्‍यावर आणून टाकलं.”

टिटवी पुन्हा पुन्हा समुद्राकडे जात राहिली.

समुद्र तसाच होता. त्याच्या लाटा तशाच उसळत होत्या.

किनार्‍यावरचे इतर पक्षी तिला हसू लागले. म्हणाले -“अगं वेडेपणा करू नकोस! तुझ्या एवढ्याशी चोचीने हा समुद्र रिकामा होणार आहे का? तुझे काम सोडून दे. समुद्राशी कोण जिंकणार?”

पण टिटवी काही थांबली नाही.

ही गोष्ट जेव्हा विष्णूच्या कानावर गेली, तेव्हा तिचे धैर्य आणि चिकाटी पाहून, त्याला सुद्धा आश्चर्य वाटले! मग काय? विष्णू प्रसन्न झाल्यावर, समुद्राला त्याचे ऐकावे लागले. समुद्राने टिटवीची अंडी तिला परत दिली!”

पूजाचे डोळे चमकले. “म्हणजे ती एकटी समुद्र रिकामा करू शकली नाही. पण तिने प्रयत्न सोडला नाही, म्हणून तिच्या मदतीला भगवान विष्णू आले!”

“बरोबर! अगदी तसंच ज्ञानेश्वर म्हणतात, मी गीतेचा अर्थ सांगणार आहे. हे काम कसे आहे? तर मा‍झ्या अल्पमतीने गीतेचा अथांग ज्ञानसागर उपसण्यासारखे आहे.” नीलाज्जी  क्षणभर थांबून म्हणाली, “आणि तुला रोज एक ओवी सांगणारी मी त्या ज्ञानेश्वरीची समुद्राच्या किनार्‍यावरची एक टिटवीच आहे. मा‍झ्या चोचीत मावेल तेवढं ज्ञान मी घेऊन येणार … या प्रयत्नांना जगदगुरू श्रीकृष्णच साहाय्य करो!”

“कित्ती छान गोष्ट आहे ही!” पूजा उत्साहाने म्हणाली. “नीलाज्जी, सगळी ज्ञानेश्वरी अशीच गोष्टींची आहे का गं?”

“हो तर! ज्ञानोबांना गोष्टी सांगायला फार आवडतात. गीतार्थ सांगताना ते कधी रूपक, कधी एखादी सुंदर उपमा, कधी एखादी गोष्ट यामधून समजावून सांगतात. ज्ञानोबा म्हणतात, हे आख्यान आहे, कथा आहे. शांत रसाने, अद्भुत रसाने, नवरसांनी भरलेली कथा आहे. ‘या ऐकायला!’”

Get Your Copy of

ओवी लाईव्ह

[Notion Press] [Amazon]

Explore other books