

नक्षत्रांची फुले
या रौद्र कालौघात आपले आयुष्यमान क्षणा इतके सुद्धा नाही. या प्रचंड अवकाशात आपले आकारमान तिळा इतके पण नाही. तरीही मानवाचा लहानसा जीव, हजारो पिढ्यांचे निरीक्षण, निष्कर्ष, ज्ञान एकत्र करून ब्रह्मांड जाणण्याचा प्रयत्न करतो! त्याच्या भव्यतेने भारावून जातो, सौंदर्याने मोहून जातो, तेजाने दिपून जातो आणि स्वतःला हरवून जातो. आकाशातील प्रकाशकणांनी मोहून गेलेली मी अजून एक. मला उमजलेल्या, भावलेल्या आकाशाच्या गोष्टी. नक्षत्रांना वाहिलेली ही एक लहानशी फुलांची ओंजळ. ज्योतीने तेजाची आरती!
प्रतीक्षा
एक सुखद झुळूक त्याची आठवण देऊन गेली. पुन्हा एकदा! वसू गालातल्या गालात हसली. ती झुळुक खेळकरपणे तिची बट वेणीतून उपसून क्षणात विरून गेली. पण तिच्या मनात मात्र त्याची चाहूल रेंगाळत राहिली.
आज वसू खूप खूप नटली! केसात जाई-जुईची फुले माळली. गळ्यात फुलांचे हार घातले. कंबरेला फुलांची मेखला बांधली. हातात गजरे, पायात सुगंधी वेलींनी विणलेले पैंजण घातले. तिच्या प्रत्येक पावलागणिक फुलांचा मंद सुगंध दरवळत होता.
आरशात स्वतःचे रुपडे पाहून स्वतःशीच हसली. कुजबुजली, “हे सगळं कुणासाठी?”
उत्तर तिच्याच मनाला ठाऊक होतं.
या सगळ्या नटण्यातून वेळ मिळाला, तेंव्हा पुन्हा त्याचीच आठवण! काय हा अजब प्रकार? कितीही दुसऱ्या कामात मन रमवायचा प्रयत्न केला, तरी मन परत त्याच्याकडे धावत जायचं. “अजून किती रे वाट पहायची?” वसू लटक्या रागात हळूच पुटपुटली.
दिवसागणिक तिची तगमग वाढत होती. प्रत्येक सकाळ आशेचा किरण घेऊन यायचा आणि संध्याकाळ होताच ती आशा पुन्हा विरून जायची. हळूहळू त्याच्या आठवणीशिवाय एकही दिवस जाईना. आताशा तर त्याच्या आठवणीने वसूला कासावीस व्हायचं. सकाळी जाग आल्यापासून ते रात्री नीज येईपर्यंत त्याचाच विचार! प्रत्येक वाऱ्याची झुळूक, प्रत्येक तरंगणारा ढग, प्रत्येक पक्ष्याचा स्वर त्याचीच आठवण करून द्यायचा. वसुला स्वतःचेच आश्चर्य वाटत होते.
काल कूस बदलत रात्र सरली. डोळा लागेना. चैन पडेना. चंद्र आकाशभर फिरून मावळतीला गेला. तारे एकेक करत विझले. पण झोप काही लागली नाही. परत यायचं वचन देऊन गेलेला सखा कुठे हरवला होता?
दवबिंदू अंथरले, चांदणे पांघरले, तरी वसुच्या विरहाचा दाह कमी होईना. पाकळ्यांचा बिछाना केला. चंदनाचा शीतल लेप लावला. मोगऱ्याचा सुगंध दरवळला. तरी तिला विसावा मिळेना.
ज्ञानोबांच्या विरहिणीतून तिची व्यथा व्यक्त झाली—
चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी ।
कान्हो वनमाळी वेगी भेटवा का ॥
कधी? कधी भेटणार मला माझा जिवलग सखा? विरहाग्नीने वसु होरपळून गेली. सुकून गेली. कोमेजून गेली. रात्रीचं जागरण तर नित्याचंच झालेलं.
पहाट व्हायची. पक्षी गायचे. फुलं उमलायची. पण वसुच्या मनाची कळी मात्र उमलेना. उगवणारा प्रत्येक दिवस मागच्या दिवसापेक्षा अधिक लांब वाटायचा. आणि रात्र? रात्र तर संपायचीच नाही.
अशाच एका रात्री मीराबाईचे आर्त स्वर कानावर आले—
सुली उपर सेज हमारी,
सोवण किस बिध होय।
गगन मंडलपर सेज पिया की,
किस बिध मिलणा होय।
हेरी मै तो प्रेम दिवाणी,
मेरो दर्द न जाणै कोय॥
“मी… मी जाणते गं तो दर्द, मीरे!” वसूच्या डोळ्यांत अश्रू तरळले. “तुझी व्यथा एक विरहिणीच जाणू शकते. तू एकटी नाहीस. मी आहे तुझ्याबरोबर.”
एके दिवशी व्याकुळतेने वसुने आर्जव केले— “सीतामाई जेव्हा रामाची वाट पाहत होती, तेव्हा हनुमंताने राम येणार हा निरोप आणला. मला कोणी धीर द्यावा? कोणी निरोप आणावा? एक शब्द… फक्त एवढंच सांगावं—’तो येतो आहे!’”
काय आश्चर्य! त्या संध्याकाळी अचानक दशदिशांत वावटळ उठली. झाडांच्या पानांनी सळसळ केली. आणि त्या सळसळीतच त्याचा संदेश आला— “हा काय? मी येतच आहे!”
वसू हुरळून गेली! खुलून गेली! तिच्या जीवात जीव आला. चेहऱ्यावर पुन्हा तेज फुललं.
आता अजून काही दिवस तग धरता येईल. आता प्रतीक्षा फार जड नव्हती.
काही दिवस गेले .. आणि मग?
आषाढाचा पहिला दिवस गडद काळे ढग घेऊन आला. शामसुंदर आभाळ खाली झुकले. वसूच्या मोकळ्या केसांत कृष्णमेघ विसावले. वारा भोवती पिंगा घालू लागला.
पावसाचा पहिला थेंब तिच्या कपाळावर अलगद विसावला.
वसु शहारली! बावरली! प्रीतीने भिजून गेली! मृद्गंधात न्हाली!
वसुंधरा मखमली हिरवा शालू ल्याली! सजली!
कारण…
‘तो’ आला…
पाऊस आला!
शतधारांनी अमृत बरसत, पाऊस आला!
Explore other books




