उर्दू मिश्रित हिंदी गाण्यांनी शमा – परवाना हि जोडी प्रसिद्ध केली आहे. कित्येक हिंदी गाण्यात जसे – “ए शम्मा तू बता, तेरा परवाना कौन है” (सुरैय्या); “मेहेफील में जल उठी शमा परवाने के लिये” (लता मंगेशकर); “शमा कहे परवानेसे, अरे चला जा, मेरी तरहा जल जायेगा, यहां नाही आ” (किशोर कुमार); “शम्मा पे परवाने क्यों होते है कुर्बान” (अमित कुमार); “तू शमा में परवाना तेरा” (अभिजित) अशा शेकडो गाण्यातून ही जोडी ऐकली आहे. त्याचा अर्थ –
शमा = मोमबत्ती (फारसी / अरबी)
परवाना = पतंगा, moth (फारसी)
शमां को बेइंतिहा चाहने वाला परवाना जान कि परवाह नही करता |
परवाना जसा स्वत:च्या जानची पर्वा न करता मोमबत्ती वर झडप घालून मरून जातो तसा हा हिंदी सिनेमातला प्रेमात वेडा झालेला ‘दिवाना परवाना’ हिरो, जान गेली तरी बेहेत्तर असे म्हणत हिरोइनीवर प्रेम करत राहतो!
बॉलीवूडच्या गाण्यातच नाही तर उर्दू शायरी मध्ये सुद्धा शमा-परवाना जोडीचे रूपक वापरले आहे –
ख़ुद ही परवाने जल गए वर्ना
शम्अ जलती है रौशनी के लिए
– सनम प्रतापगढ़ीइश्क़ की फ़ितरत न बदली है न बदलेगी कभी
शमा रौशन कीजिए आता है परवाना अभी
– रईसुद्दीन फ़रीदीहोती कहाँ है दिल से जुदा दिल की आरज़ू
जाता कहाँ है शमा को परवाना छोड़ कर
– जलील मानिकपूरीशमा माशूक़ों को सिखलाती है तर्ज़-ए-आशिक़ी
जल के परवाने से पहले बुझ के परवाने के बाद
– जलील मानिकपूरी
जिथे कुठे वाचले, तिथे आढळले की – उर्दू शायरीच्या संदर्भात शाम परवाना चे रूपक चिक्कार जुने आहे. हे रूपक उर्दुने पर्शियन परंपरेतून घेतले आहे. उर्दू कवितेमध्ये ते इतके खोलवर रुजले आहे की ते आता ‘परदेशी’ राहिलेले नाही.
मला देखील बरेच दिवस वाटत होते की मुघल, फारसी, अरबी आणि उर्दू शायरांची ही कल्पना लाजबाब आहे! दिव्याच्या आत्यंतिक आकर्षणाने, आपल्या जीवाची भीती न बाळगता, ज्योतीवर झेप घेणारा पतंग आणि एखाद्या ललनेच्या आकंठ प्रेमात बुडालेला नायक! काय सुंदर उपमा आहे!
पण! उर्दू भाषेत जसे ७५% शब्द संस्कृत / प्राकृत / हिंदी आहेत तसे उर्दू शायरी मधील कित्येक कल्पना मूळ भारतीय आहेत. संस्कृत काव्यातील आहेत. उर्दू मध्ये शमा-परवाना जोडी वापरली गेली आहे, तशीच ती फार पूर्वीपासून संस्कृत आणि इतर भारतीय काव्यात पण वापरली गेली आहे. किती वेगवेगळ्या प्रकारे दीप-पतंगाचे रूपक वापरले गेले आहे. पहा!
भगवंताने अर्जुनाला रणभूमीवर गीतोपदेश दिला. त्यावेळी अर्जुनाने भगवंताचे विश्वरूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली. भगवंताने त्याला दिव्य दृष्टी दिली आणि आपले प्रचंड विश्वरूप त्याच्यापुढे प्रकट केले – सहस्र शीर्ष, सहस्र बाहू, सहस्र पाय असलेले सर्व भूमी आणि आकाश व्यापून टाकणाऱ्या भगवंताच्या एका मुखातून नवीन जीव जन्म घेत होते, तर काही मोहित जीव दुसऱ्या एका अक्राळविक्राळ मुखात शिरून मृत्यूकडे धाव घेत होते. ते पाहून अर्जुन म्हणाला –
यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा
विशन्ति नाशाय समृद्धवेगाः।
तथैव नाशाय विशन्ति लोका
स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः || ११.२९ ||
अर्जुन स्तिमित होऊन, विश्वारूपाचे वर्णन करताना म्हणाला- हे भगवंता! पतंग जसा प्रदीप्त ज्वाळेत वेगाने धावत जाऊन स्वत:चा नाश करून घेतो, तसे हे मोहाने ग्रासलेले जीव, स्वत:चा नाश करून घेत असलेले असे मी पाहत आहे!
भागवत पुराणात सुद्धा, दीप आणि पतंगाची उपमा वापरली आहे. अकराव्या स्कंधाच्या आठव्या अध्यायात, अवधुत उपख्यान आले आहे. त्या मध्ये अवधूत आपल्या २४ गुरूंच्या विषयी सांगतात. त्यांचा एक गुरु पतंग आहे. मी पतंग्याकडे पाहून मी काय शिकलो हे अवधूत सांगत आहेत –
दृष्ट्वा स्त्रियं देवमायां तद्भावैरजितेन्द्रियः ।
प्रलोभितः पतत्यन्धे तमस्यग्नौ पतङ्गवत् ॥७॥
राजन्! पतंग जसा ज्योतीच्या सौंदर्याने आकर्षित होऊन अग्नीत उडी मारून जळून जातो, त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांवर ताबा न ठेवणारा पुरुष जेव्हा एखाद्या सुंदर स्त्रीला पाहतो तेव्हा तो तिच्याकडे आकर्षित होतो. मग ती परस्त्री असली तरी तो आपल्या मनावर ताबा ठेवू शकत नाही. असा मनुष्य घोर अंधकारात, नरकात पडून स्वतःचा नाश करून घेतो.
योषिद्धिरण्याभरणाम्बरादि द्रव्येषु प्रलोभितात्मा मूढः।
मायारचितेषु ह्युपभोगबुद्ध्या पतङ्गव नश्यति नष्टदृष्टिः॥८॥
मूर्ख मनुष्य कामिनी, कांचन, वस्त्र, अलंकार सारख्या नाशिवंत ऐहिक गोष्टींमध्ये गुरफटतो. त्याचे मन या आकर्षक परंतु अशाश्वत गोष्टींचे सेवन करण्यास उत्सुक असते. असा विवेकहीन मनुष्य आगीत झेप घेणाऱ्या पतंगाप्रमाणे नष्ट होतो.
एकनाथांनी ह्या श्लोकांवर भागवतात लिहिले आहे –
दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ।
बळें आलिगूं जातां पैं गा । मरणमार्गा लागले ॥७४॥
पुढिला पतंग निमाला देखती । तरी मागिल्या दीपीं अतिआसक्ती ।
तेवीं स्त्रीकामें एक ठकती । एकां अतिप्रीती पंतगन्यायें ॥७५॥
वनिता देखोनि गोमटी । विवेकाची होय नष्ट दृष्टी ।
प्रलोभें उपभोगा देती मिठी । ते दुःखकोटी भोगिती ॥८८॥
देखोनि दीपरूपीं झगमगी । उपभोगबुद्धि पतंगी ।
उडी घालितां वेगीं । जळोनि आगीं नासती ॥८९॥
दीपाचा संग करण्यासाठी आतुर झालेला पतंग, तिला बळेच आलिंगन देता मृत्यू पावतो. पुढचा पतंग मेलेला पाहून सुद्धा मागचा पतंग त्यातून शिकत नाही. तो दुसरा देखील दिव्यावर आसक्त होऊन झेप घेतो! तसे सुंदर स्त्री पाहून तिचा बळेच उपभोग घेण्यासाठी तिला मिठीत घेऊ पाहणारा विवेकहीन मनुष्य पतंगाप्रमाणे नष्ट होतो.
ज्योतीची आणि पतंगाची उपमा कालिदासाने देखील कुमारसंभव मध्ये वापरली आहे. सतीच्या मृत्युनंतर महादेव ध्यानस्त बसले होते. सतीचा हिमालयाच्या पोटी दुसरा जन्म झाला. आणि तिने तारुण्यात पदार्पण केल्यावर महादेवाशीच विवाह करायचे मनात घेतले. शंकर पती मिळावा म्हणून ती घोर तपश्चर्या करत होती. शिव-पार्वतीच्या मुलाच्या हातून तारकासुराचा मृत्यू ठरला होता. त्यामुळे स्वर्गातील देव सुद्धा आतुरतेने शिव-पार्वतीचा विवाह कधी होईल ह्याची वाट पाहत होते. शेवटी इंद्राने कामदेवावर शंकराला ध्यानातून उठवण्याची कामगिरी दिली. कालिदास सांगतो –
शंकर हिमालयात एका खडकावर ध्यानस्त बसले आहेत. पार्वती रोजच्या प्रमाणे शंकराची पूजा करण्यासाठी त्याची आवडती पांढरीशुभ्र फुले परडीतून घेऊन आली आहे. ती शंकराच्या पायाशी बसून फुले वाहत आहे. त्या पूजेचा साक्षी असलेल्या कामदेवाने बरोबर तोच क्षण पकडला शंकरावर आपले मदनबाण सोडण्यासाठी –
कामस्तु बाणावसरं प्रतीक्ष्य पतङ्गवद्वह्निमुखं विविक्षुः ।
उमासमक्षं हरबद्धलक्ष्यः शरासनज्यां मुहुराममर्श ॥ ३।६४॥
अग्नीत उडी घेण्यास उत्सुक असलेल्या पतंगाच्या सारखा, कामदेव महादेवावर मदनबाण सोडण्यासाठी उत्सुक झाला होता. कामदेव आपल्या धनुष्याच्या प्रत्यंचेवर आतुरतेने बोटे फिरवत होता! आता कामदेव संमोहन नावाचा अमोघ बाण सोडणार, त्याने महादेवाची समाधी भंग होणार, त्रिनेत्रधारी कामदेवाला पाहून संतापणार, ते तिसरा नेत्र उघडणार आणि पतंग जसा क्षणार्धात अग्नीमध्ये जळून भस्म होतो तसा तो कामदेव महादेवाच्या क्रोधपूर्ण कटाक्षाने जाळून भस्म होणार!
माउलींनी ज्ञानेश्वरी मध्ये पतंग आणि दीपाची उपमा वापरली आहे. कर्मयोगच्या तिसऱ्या अध्यायात ते म्हणतात –
पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण ।
तेवीं विषयाचरण । आत्मघाता ॥ ३.२०१ ॥ – ज्ञानेश्वरी
पतंगाने जर दिव्याला आलिंगन दिले, तर त्याला त्याच क्षणी मरण येणार. ते चुकणार नाही, शंभर टक्के त्याला मरण येणार. त्या प्रमाणे जो मनुष्य विषयांना आलिंगन देण्यासाठी आतुर असतो, जो विषयांचा अनिर्बंध उपभोग घेतो त्याचा नाश ठरलेला आहे. मनुष्याचे विषय सेवन पतंग्याने अग्नीला आलिंगन देण्यासारखे आहे. जसे पतंगाचा नाश अचूक आहे, तसे विषयाचरणी मनुष्याचा आत्मघात ठरलेला आहे.
अशी अनेक उदाहरणे भारतीय साहित्यात मिळतील.
फारसी आणि उर्दू मध्ये दिया-परवानाचे रूपक केवळ प्रेमिकांसाठी वापरले आहे. उदात्त, उत्तम, अत्युच्च प्रेमाचे प्रतिक म्हणून वापरले गेले आहे. भारतीय साहित्यात मात्र दीप-पतंगाची जोडी प्रेमिकांसाठी वापरली गेली नाही. आपल्या प्रेमाच्या कल्पनेत असे बळेच ज्योतीला आलिंगन देऊन मरून जाणे बसतच नाही. “प्रेमासाठी मरून जाणे”, “जान न्योछावर करणे”, “जल जायेंगे”, “मिट जायेंगे”, “मर जायेंगे” सारख्या वाक्यांना फाजीलपणा म्हणले जाईल. आपली प्रेमाची कल्पना एकतर्फी प्रेमाची नाही, दोघानांही एकमेकाविषयी प्रेम असावे अशी आहे. तसेच प्रेमासाठी मरण्यापेक्षा, विवाह करून शंभर वर्ष एकत्र आनंदात जगण्यावर भर दिला आहे.
भारतीय साहित्यात दीप-पतंगाची जोडी प्रेमासाठी नाही तर घातक आकर्षणासाठी वापरली गेली आहे. बळजबरीने आपले प्रेम दाखवू पाहणाऱ्या अविवेकी, विषयलंपट माणसाला पतंग म्हणले आहे. माहित असून सुद्धा धोक्यात जीव घालून स्वत:चा नाश करून घेणाऱ्यासाठी पतंगाची उपमा वापरली आहे. विषयांचे सेवन मधुर-विषासारखे आहे हे माहित असून सुद्धा त्याकडे आकर्षित होऊन विषयसुख उपभोगणाऱ्याला पतंग म्हणले आहे. समोरचा झडप घालून मरताना दिसत असून पण मागच्याचे डोळे उघात नाहीत, त्याला पतंग म्हणले आहे. मग ह्या दुष्ट चक्रातून बाहेर कसे पडायचे? एकनाथ सांगतात –
एवं योषितारूपें माया । उपभोग भुलवी प्राणियां ।
जे विमुख हरीच्या पायां । त्यांसीच माया भुलवितु ॥९०॥
जो हरीच्या पायांपासून दुरावला आहे तोच मायेला फसतो आणि पतंगा प्रमाणे नष्ट होतो. आपण पतंगा प्रमाणे जगातील ऐहिक, अशाश्वत, आकर्षणांना भुलून नष्ट होऊ नये असे वाटत असेल तर – नित हरिस्मरणी रत राहावे.

Leave a comment